अल्झायमर आजाराची लक्षणे, कारणे आणि उपाययोजना याबाबत समजून घेणे

अल्झायमर आजाराची लक्षणे, कारणे आणि उपाययोजना याबाबत समजून घेणे

Dr Santosh Prabhu August 21, 2024
अल्झायमर हा एक मेंदूशी संबंधित आजार आहे जो हळूहळू व्यक्तीच्या विचार करण्याची आणि आठवणींच्या क्षमतेवर परिणाम करतो. काळानुसार हा विकार अधिकच वाढत जातो आणि त्यामुळे प्रभावित व्यक्तींची कार्यक्षमता आणि इतरांशी संवाद साधण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर कमी होते. 65 वर्षे वयाच्या आधी अल्झायमर होणे अत्यंत दुर्मिळ आहे, परंतु या वयानंतर प्रत्येक पाच वर्षांनी या विकाराचा धोका दुप्पट होतो. पण सामान्यत: अनेक लोक 90 वर्षांपेक्षा जास्त वयापर्यंत जगतात आणि त्यांना अल्झायमरचा त्रास होतोच असे नाही. अल्झायमर चे लक्षणे, कारणे, निदान, उपचार आणि संबंधित विषयांबद्दल अधिक जाणून घेऊया.

अल्झायमर आणि डिमेंशिया मधील फरक

डिमेंशिया म्हणजे काय? डिमेंशिया ही एक स्थिती आहे ज्यात मेंदूच्या कार्यक्षमतेत घट होते. यामुळे विचार करण्याची, स्मरणशक्ती आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. डिमेंशिया असलेल्या व्यक्ती दैनंदिन जीवनातील सामान्य कार्ये करण्यास असमर्थ असतात. अल्झायमर म्हणजे काय? अल्झायमर हा डिमेंशियाचा सर्वात सामान्य प्रकार आहे आणि डिमेंशियाच्या 60-80% लोकांना याचा त्रास होतो. अल्झायमर असलेल्या व्यक्तींना नवीन माहिती लवकर विसरण्याची सवय असते आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितलेल्या गोष्टीही लक्षात ठेवण्यास अडचण येते. अल्झायमर चे कारण काय आहे? अल्झायमर चे नेमके कारण अजूनही अज्ञात आहे. परंतु, संशोधकांना हे माहित आहे की मेंदूमध्ये होणाऱ्या बदलांशी याचा संबंध आहे. काहींचे मत असे आहे की मेंदूमध्ये असामान्य प्रोटीनच्या तंतु आणि गाठी निर्माण झाल्यामुळे समस्या निर्माण होते. पण या एकाच कारणामुळे हा विकार होत नाही, असे अनेक घटक एकत्रित येऊन हा विकार होतो असे मानले जाते. कशामुळे होतो अल्झायमर? अल्झायमरचा धोका वाढवणारे विविध घटक आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वाढते वय. इतर घटक स्पष्ट नसले तरी काही गोष्टी या विकाराचा धोका वाढवू शकतात:
    1. हृदयविकार 2. मधुमेह 3. डोक्याला झालेली इजा 4. कुपोषण 5. धूम्रपान

अल्झायमर आनुवंशिक आहे का?

जर तुमच्या पालकांपैकी किंवा भावंडांपैकी कोणाला अल्झायमर असेल तर तुम्हाला हा विकार होण्याची शक्यता दुप्पट असते. अल्झायमरचा धोका वाढवणारे सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे एपोलीपोप्रोटीन ई (APOE) अल्झायमर असलेल्या लोकांमध्ये एपोलीपोप्रोटीन ई (APOE) उपस्थिती दोन ते तीन पट अधिक असते. मात्र, या जनुकाचे प्रकार असलेल्या अनेक लोकांना अल्झायमर होत सुद्धा नाही.

अल्झायमर विकारावर उपचार

अल्झायमर विकाराचा उपचार विविध उपचार पद्धतींचा वापर करून केला जातो, ज्यामुळे लक्षणे कमी करता येतात, विकाराचा प्रगतीचा वेग कमी करता येतो आणि निरोगी जीवन वाढवता येते.

औषधांशिवाय केल्या जाणाऱ्या उपाययोजना

सुरुवातीच्या टप्प्यात मेमरी एड उपयोगी ठरू शकतात. साधे पण नियमित रूटीन ठेवणे अल्झायमर असलेल्या व्यक्तींना त्यांच्या एरियात सहज नेव्हिगेट करण्यात मदत करू शकते. जर कोणी केअरगिव्हर म्हणजे काळजी घेण्यासाठी माणूस ठेवला असेल तर तो अल्झायमर असणाऱ्या व्यक्तीशी चांगल्या प्रकारे संवाद साधून त्यांना त्रासातून मुक्त करण्याचे मार्ग शोधण्यात मदत करू शकतात.

औषधोपचार

अल्झायमरच्या उपचारासाठी FDA ने तीन औषधांना मंजुरी दिली आहे, ज्यांना कोलीनएस्टरेज इनहिबिटर म्हणतात. या औषधांमध्ये समाविष्ट आहेत:
    1. Donepezil (Aricept) डोनेपझिल (एरिसेप्ट) 2. Galantamine (गॅलंटामाइन) 3. Rivastigmine (रिवास्टिग्माइन)
अजून एक FDA ने मंजूर केलेले औषध आहे ज्याला नामेंडा (मेमंटाइन) म्हणतात. रुग्णांना या चार मंजूर औषधांपैकी एक औषध किंवा कोलीनएस्टरेज इनहिबिटर आणि नामेंडा यांचं कॉम्बीनेशन करून उपचार दिले जाऊ शकतात. या औषधांमुळे काही लोकांमध्ये लक्षणे कमी होऊ शकतात किंवा लक्षणांची प्रगती कमी होऊ शकते. पण, ही औषधे अल्झायमरला कारणीभूत असलेल्या मूळ समस्यांवर उपचार करत नाहीत.

अल्झायमर सोबत जगणे

अल्झायमर असलेल्या व्यक्तींना त्यांच्या तब्येतीत सुधारणा करण्यासाठी सामाजिक, भावनिक, शारीरिक आणि वैद्यकीय सहाय्याची आवश्यकता असते. अल्झायमर असलेल्या व्यक्तींच्या गरजा प्रारंभिक, मध्यम आणि तीव्र टप्प्यानुसार बदलतात.

कुटुंब आणि काळजी घेणारा

अल्झायमर असलेल्या व्यक्तींच्या उपचारातील सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि काळजी घेणारा, स्वत: रुग्णाच्या आरोग्याला आणि गरजांना प्राधान्य द्या जेणेकरून त्यांना जवळच्या व्यक्तीचा आधार मिळेल.
    1. सामाजिक सहाय्य: अल्झायमर असलेल्या व्यक्तींना सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी द्या. हे त्यांचे मनोबल उंचावण्यास मदत करते. 2. भावनिक सहाय्य: त्यांना समजून घेण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी भावनिक समर्थन महत्वाचे आहे. त्यांच्याशी नियमित संवाद आणि सहानुभूतीने वागा. 3. शारीरिक सहाय्य: रोजच्या गोष्टींमध्ये त्यांना मदत करा, जसे की चालणे, आंघोळ करणे, जेवण भरवणे इत्यादी. 4. वैद्यकीय सहाय्य: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे आणि नियमित वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे.